Login

"काय माझा गुन्हा...?" भाग ४३

सामाजिक
दिर्घ कथा लेखन स्पर्धा...
डिसेंबर व जानेवारी...२०२५-२०२६


"काय माझा गुन्हा...?" भाग ४३


गौरवी आपल्या आई-वडिलांना समजावून सांगता-सांगता थकून गेली होती… तिचे शब्द संपले होते, डोळ्यांतील पाणी आटलं होतं, आणि आशेची दोरी हळूहळू सुटत चालली होती…

पण यात एकट्या गौरवीचाच त्रास नव्हता… तिच्या आई-वडिलांनाही तिला नकार देताना मनस्वी वेदना होत होत्या…

स्वतःच्या पोटच्या मुलीला “नाही” म्हणणं... एवढं सोपं नव्हतं…
पण त्यांचा नाईलाज होता… कारण त्यांच्या नजरेत हा प्रश्न आजचा नव्हता, तो तिच्या उद्याचा होता…

आज प्रेम आहे म्हणून सगळं ठीक वाटेल… पण उद्या जर परिस्थिती बदलली, जर नाती तुटली, जर समाजाने स्वीकार नाकारला, तर आयुष्यभर त्या वेदना फक्त गौरवीलाच सहन कराव्या लागतील…

मुलगा त्यांना वाईट वाटत नव्हता…‌खरंतर, तो त्यांच्या नजरेत चांगलाच होता…
पण एक भीती सतत मनात डोकावत होती...
"तो खरोखर आयुष्यभर तिच्या पाठीशी उभा राहील का…?"
"की वेळ आली, आणि त्याच्यावर दबाव वाढला,
तर तो आपल्या कुटुंबाच्या बाजूने उभा राहील कि आपल्या मुलीच्या…?"

गौरवीच्या आई-वडिलांना त्यांच्या प्रेमावर शंका नव्हती…
तर त्यांना शंका होती... ती म्हणजे समाजावर, परिस्थितीवर,
आणि त्या नात्याच्या टिकावावर…
त्यांच्यासाठी हा प्रश्न जात किंवा प्रतिष्ठेचा नव्हता…
तो प्रश्न होता आपल्या मुलीच्या सुरक्षित भविष्याचा…
आणि याच भीतीपायी ते स्वतःच्या काळजावर दगड ठेवून
गौरवीला नकार देत होते…

शेवटी व्हायला नको होतं तेच घडलं… त्या रात्री गौरवीने माधवला फोन केला... आणि आपल्या थरथरत्या आवाजात म्हणाली...
“मी येतेय माधव… पुण्याला… तुझ्याकडे… कायमची...”

गौरवीचे ते बोलणं ऐकून माधव थोडा धास्तावला...

शेवटी दोघांचेही फोनवर खूप वेळ बोलणं झालं…
कधी हो, कधी नाही… कधी धीर, कधी भीती…
पण शेवटी दोघांनीही त्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं...
"पळून जायचं… आणि लग्न करायचं…"

प्लॅन साधा होता…
गौरवी रोजच्यासारखी कॉलेजसाठी घराबाहेर पडेल… कोणीही संशय घेणार नाही… आणि ती थेट रेल्वे स्टेशन गाठेल…

अगोदरच स्टेशनवर माधव तिची वाट पाहत उभा असेल…
आणि मग... ते दोघंही डेक्कन राणी एक्स्प्रेस… ते पुणे… असा नवीन आयुष्यात पहिल पाऊल टाकतील...

त्या रात्री गौरवी शांतपणे झोपली, पण झोपेच्या कुशीत भविष्याची स्वप्नं जागीच होती…

नवं आयुष्य… माधवसोबतचा संसार… आपुलकी… प्रेम... आधार…आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे... स्वतःच्या मर्जीने घेतलेला निर्णय…

सकाळ झाली…
घरात नेहमीसारखीच लगबग होती… आई स्वयंपाकघरात…
वडील आपल्या कामात… आणि छोटा भाऊ त्याच्या बेडरूममध्ये पलंगावर झोपलेला असतो...

गौरवी आपल्या खोलीत खांद्याची बॅग उघडते… आणि त्यात काही मोजके कपडे… गरजेच्या वस्तू… आणि थोडे पैसे… व  मनात साठवलेली भविष्याची भरपूर स्वप्नं…

बॅग बंद करताना तिच्या हाताला क्षणभर थरकाप उडतो…
ही बॅग फक्त सामानाची नव्हती… ती तिच्या संपूर्ण आयुष्याची दिशा बदलणार होती…

घरातून बाहेर पडताना ती थांबते… मागे वळून पाहते... आणि
दाराकडे पाहते… तिथून ती आपल्या आई-वडिलांच्या खोलीकडे एक नजर टाकते… तीच्या डोळ्यांत पाणी येतं… पण पाय मागे फिरत नाहीत…

“मी कॉलेजला जातेय… आईबाबा मी येते..."  असं नेहमीसारखं सांगून ती घराबाहेर पडते…

आणि त्या क्षणापासून तिचं आयुष्य दोन रेषांमध्ये विभागलं जातं...
आतापर्यंतचं… आणि आतापासूनचं…


क्रमशः....

©® प्राची कांबळे (मिनू)


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."